अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी DPDC चा ठराव घेऊन शासनाला पाठविणार; आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या मागणीवर पालकमंत्र्यांचे निर्देश

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः  परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु मदत देताना काहीच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरविले होते. चिखलीसह अन्य तालुका मदतीपासून वगळला. त्यामुळे जे तालुके मदतीपासून वगळले त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ठराव घेऊन शासनाकडे मदत मागावी, अशी मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्याने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ठराव घेऊन मुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश दिल्याने मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा आ. सौ. महाले पाटील यांच्या प्रयत्नांनी पल्लवित झाली आहे.

१० जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची गूगल मिटवर ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अनेक प्रश्नांना उपस्थित केले. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये  झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पिक विमा योजनेअंतर्गत देखील पिकाचे नुकसान झाल्याचे आतापर्यंत एकूण हजारो  पूर्वसूचना प्राप्त झालेल्या होत्या. सोयाबीन व उडीद पिकास पक्वतेच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व जमिनीतील आद्रतेचे प्रमाण क्षमतेपेक्षा जास्त वाढल्याने उभ्या पिकांच्या दाण्यास अंकुर फुटलेले आहे. यामुळे उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे.

शासन निर्णय 13 मे 2015 अन्वये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या क्षेत्राचा पंचनामा करून त्याआधारे नुकसान भरपाई अनुज्ञेय आहे. परंतु पावसाची सरासरी कमी असली तरी पाऊस हा सतत पडलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन व उडीद पिकांचे सततच्या पावसामुळे अधिक नुकसान झाल्याने, अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रासोबतच सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मान्यता मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन यांच्याकडे केलेली आहे. त्यांनी पंचनामे करण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच सोयाबीन, उडीद व मूग यांची कापणी झालेली आहे. पंचनामे करण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या शेतात पिके नाहीत. त्यामुळे पंचनाम्याची अट न ठेवता जिल्हा नियोजनचा ठराव घेऊन सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मागणी केली आहे.

प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविणार; आ सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश
आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी ९ ऑक्‍टोबरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथे अतिवृष्टी झाली व हातणी येथे अतिवृष्टी झाली नाही. परंतु सोनेवाडी येथील पर्जन्य मापक यंत्र हे हातणी येथे बसविण्यात आल्यामुळे सोनेवाडी येथे अतिवृष्टी झाली नाही असा अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमाप यंत्र बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत सर्व ९० महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले असून, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी केली होती. त्यावर 780 गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा प्रस्ताव DPC ला प्रस्ताव सादर झालेला आहे.  प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली असता प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यामुळे आता प्रत्येक गावातील पडलेला पाऊस मोजल्या जाणार आहे त्यामुळे कोणत्या गावात किती पाऊस पडला हे समजेल.

भारतीय जैन संघटनेच्या मशिनरीला डिझेल देऊन नदी खोलीकरण करा
भारतीय जैन संघटनेने मागील दोन वर्षांपूर्वी जिल्हा 12 मध्ये पोकलॅन्ड आणि जेसीबी आणून अनेक नद्यांची खोलीकरण व रुंदीकरण केलेले आहे. त्याच प्रमाणे राहिलेल्या नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण यासाठी भारतीय जैन संघटनेच्या मशिनरीला डिझेल उपलब्ध करून देऊन करण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी केली असता याबाबत राज्य स्तरावरील नियोजन बैठकीमध्ये हा मुद्दा मांडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

योजना बाह्य रस्ता व पुलांसाठी निधी देणे...
योजना बाह्य रस्ते व पुलांसाठी कोणताही निधी वापरता येत नसल्याने अनेक गावांचा संपर्क पावसाळ्यामध्ये तुटत असतो. उदा चिखली विधानसभा मतदारसंघातील उत्तरादा, बोरगाव काकडे, शेलूद या ठिकाणी पुलांची कामे करणे गरजेचे आहे. यासाठी योजनाबाह्य रस्ते व पुलांची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा यावेळी आ. सौ. महाले पाटील केली.