जिल्ह्याची पाऊले समाजपरिवर्तनाच्या दिशेने! प्रा. डी. एस. लहानेंनी घेतलेल्या विधवा परिषदेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले परिवर्तनाचे पाऊल; 

अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रशासकीय स्थरावरून काढले परिपत्रक! गावपातळीवर अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनासाठी पथक..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १० डिसेंबरला बुलडाण्यात शिवसाई परिवाराचे प्रा. डी.एस. लहाने यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक अशी विधवा परितक्त्या महिला परिषद संपन्न झाली. माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, आणि जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते. विधवा महिलांना सोसाव्या लागणाऱ्या अनिष्ट प्रथांवर या परिषदेत चिंतन ,मंथन झाले. अनिष्ट प्रथा बंद होऊन विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी असा सुर परिषदेत उमटला. दरम्यान या कार्यक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून परिपत्रक जारी करून जिल्ह्याची पाऊले सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आपल्यातील संवेदशीलतेचा परिचय देत अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी पाऊल उचलले आहे. 
१० डिसेंबरला प्रा. डी.एस. लहाने यांच्या पुढाकारातून बुलडाण्यात ऐतिहासिक विधवा महिला परिषद झाली. विधवा पुनर्विवाहांना प्रोत्साहन मिळावे, अनिष्ट विधवा प्रथा बंद व्हाव्या असे ठराव या परिषदेत मांडण्यात आले. हा विषय लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा कार्यक्रमात प्रा. डी.एस. लहाने यांनी बोलून दाखवली होती. यावर आ.डॉ. शिंगणे यांनी विधिमंडळात तर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. आता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी सुरू केली आहे.
ग्रामपंचायत पातळीवर अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनासाठी पथक..
   पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकु पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथा प्रचलित आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात ठराविक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने मानवी हक्कांचे तसेच त्यांना प्राप्त घटनात्मक अधिकाराचे उल्लंधन होते. त्यामुळे या प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी परिपत्रकात म्हटले आहे. त्यासाठी मिशन वात्सल्य अंतर्गत गठीत वॉर्डस्थरीय व ग्रामस्थरीय पथकांनी समाजात प्रचलित असलेल्या विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी दिल्या आहेत.
ग्रामपातळीवरील पथकांनी काय करावे?
  पथकांनी सदस्यांनी वॉर्डात, गावात विवाहित पुरुषाच्या मृत्यूची घटना घडल्यावर त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन करावे व त्यानंतर विधवा प्रथेच्या अनिष्ट परिणामांबाबत कुटुंबीयांचे प्रबोधन करावे. पतीच्या निधनामुळे आधीच दुःखात असलेल्या महिलेवर विधवा प्रथेमध्ये समाविष्ट कृतीमुळे भावनिकदृष्ट्या जास्त अनिष्ट परिणाम होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आणून द्यावे. या प्रथेमुळे आपल्याच कुटुंबातील एका सदस्यावर अन्याय होतो.तिचा सन्मान कमी होतो. समाजातील तिचे स्थान दुय्यम बनते. तिचा दोष नसतांनाही काही सामाजिक ,धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी तिला मनाई करण्यात येते. याबाबत कुटुंबातील सदस्यांचे संवेदिकरण करावे. सदर प्रथा न अवलंबण्याबाबत कुटुंबीयांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा. गावातील वॉर्डातील लोकप्रतिनिधी तसेच अन्य प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधून विधवा प्रथेच्या निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. विधवा प्रथा निर्मुलनाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील हेरबाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाप्रमाणे आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारचे ठराव पारित करण्याबाबत संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध समाजातील विश्वस्तांना प्रोत्साहित करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केल्या आहेत.