निष्ठावान कार्यकर्त्याचा आक्रोश!
काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते राजेश मापारींनी दिला राजीनामा; लोणार तालुक्यात काँग्रेसला भगदाड पडण्याचे चिन्ह?
Nov 18, 2025, 10:15 IST
लोणार (सचिन गोलीच्छा :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील कट्टर व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले राजेश मापारी यांनी अखेर आज पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
मापारी हे गेल्या ३२ वर्षांपासून काँग्रेसशी निष्ठेने कार्यरत होते. त्यांनी १९९५ मध्ये युवक काँग्रेस शहराध्यक्ष, १९९८ मध्ये तालुका काँग्रेस सरचिटणीस, तर सलग अठरा वर्षे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे चिरंजीवदेखील मागील सात वर्षांपासून युवक काँग्रेस बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
मापारी यांच्या सक्रिय कार्यामुळे तालुक्यात काँग्रेसची मजबुत पकड राहिली. मात्र, आगामी नगरपालिका निवडणुकीत पैशाच्या जोरावर उमेदवारीचे वाटप होत असून, जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी राजीनाम्यात केला आहे.
त्यांनी म्हटले की, “पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. नुकतेच प्रवेश केलेल्या, कालपर्यंत काँग्रेसविरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना कोणताही अर्ज नसतानाही तिकीट दिले जात आहे. मेहकर मतदारसंघातील काही मोठ्या नेत्यांनी पैशांच्या व्यवहारातून तिकिटे दिली,” असा आरोप त्यांनी केला.
या अन्यायाविरोधात आज त्यांनी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला.
राजेश मापारींच्या या पावलामुळे लोणार तालुक्यातील काँग्रेस संघटनेत मोठा भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात पक्षात शांती भंग झाली नाही तरच नवल असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.