गायी हाकलण्यासाठी गेला, पाय घसरून पडला तरुण! २३ वर्षीय तरुणाचा पूर्णा नदीपात्रात पडून मृत्यू.... पातोंडा शिवारातील घटनेने हळहळ...

 
 निमगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २१ मे) पातोंडा शिवारात घडली. तुषार रामदास तायडे (वय २३, रा. आलमपूर, ता. नांदुरा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुषार तायडे हा नांदुरा येथील कोठारी कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. तसेच त्याच्या मालकीच्या गायी पातोंडा शिवारातील उमेश कुवारे यांच्या गोठ्यावर ठेवण्यात येत होत्या. गावातील उमेश कुवारे यांच्या बकऱ्यांसोबतच तुषारच्या गायी देखील चारल्या जात होत्या. दररोजप्रमाणे गुरुवारीही तुषार हा गायींना पाणी पाजण्यासाठी गोठ्यावर गेला होता.
दरम्यान, त्याची एक गाय पूर्णा नदीपात्राच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच तिला परत हाकलण्यासाठी तुषार नदीकाठावर गेला. यावेळी त्याचा पाय घसरून तो नदीपात्रातील पाण्यात पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी ऋषीकेश संतोष तायडे (वय २९, रा. आलमपूर) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेनंतर तुषार याचे शव बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आलमपूर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुषार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील व बहीण असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नांदुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोहेकॉ. सोळंके यांच्याकडे सोपविला आहे.