‘हिंदू समाज संघटित तरच देश अधिक मजबूत!’ चिखलीत विजयादशमी उत्सवात दुर्गादासजी व्यास यांचे प्रतिपादन; स्वदेशीचा वापर, सामाजिक समरसता आणि शिस्तबद्ध नागरिकत्वाचा दिला संदेश!

 चिखलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव उत्साहात; घोषवादन, विविध प्रात्यक्षिके आणि सांघिक गीतांनी वेधले लक्ष

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदू समाज दोषमुक्त, सामर्थ्यवान आणि संघटित राहिला, तर देशही अधिक मजबूत होईल. भारताला परमवैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य (घुमंतू कार्य) दुर्गादास व्यास यांनी केले. चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिखली नगराच्या वतीने आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी स्वदेशीचा स्वीकार, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समरसता आणि नागरिकांच्या कर्तव्यांवर विशेष भर दिला.

           ADVT 👆

स्वदेशीचा स्वीकार करा, देशाच्या प्रगतीत योगदान द्या!

दुर्गादास व्यास यांनी आपल्या मार्गदर्शनात भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा आणि देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख केला. उपग्रह तंत्रज्ञान तसेच स्वदेशी संरक्षण शस्त्रांची निर्मिती ही भारताच्या सामर्थ्याची उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी परदेशी वस्तूंच्या मोहापासून दूर राहून स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.देश मजबूत होण्यासाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. दैनंदिन जीवनात शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रहिताची भावना जोपासल्यास देशाच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण रक्षणापासून वाहतूक शिस्तीपर्यंत नागरिकांना आवाहन

समाजजीवनातील छोट्या-छोट्या कृतींमधूनही राष्ट्रनिर्मितीला हातभार लावता येतो, असे सांगताना व्यास यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा अपव्यय टाळणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी वृक्षारोपण करणे, अशा सवयी नागरिकांनी अंगीकाराव्यात, असे त्यांनी सांगितले. यासोबतच वाहतुकीचे नियम पाळून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक समरसतेचा संदेश

सामाजिक समरसतेच्या मुद्द्यावर बोलताना दुर्गादास व्यास यांनी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन आणि चवदार तळे सत्याग्रहाचा संदर्भ दिला. समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यता दूर करून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान मिळणे आणि परस्परांमध्ये बंधुभाव वाढणे हे संघटित समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचा संदेश त्यांच्या भाषणातून देण्यात आला.प्रभू श्रीराम यांच्या चारित्र्याचा आदर्श अंगीकारून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालल्यास अखेरीस सत्याचाच विजय होतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एका स्वयंसेवकाने वर्षभरात एका नव्या व्यक्तीला जोडावे!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तार देशभरातील एक लाख गावांमध्ये आणि ४० हून अधिक देशांमध्ये झाल्याचे सांगत व्यास यांनी संघकार्याच्या विस्तारावर भर दिला. प्रत्येक स्वयंसेवकाने वर्षभरात किमान एका नव्या व्यक्तीला संघाशी जोडण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. संघटित समाजनिर्मिती आणि राष्ट्रहिताची भावना व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

‘सेवा, समर्पण आणि त्यागाचे मूर्तिमंत रूप म्हणजे संघ’

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारतीय स्टेट बँकेच्या चिखली शाखेचे मुख्य प्रबंधक घनश्याम गिरी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सेवा, समर्पण आणि त्याग यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचे सांगत राष्ट्रउभारणीच्या कार्यात संघ सदैव अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘संघ म्हणजे शक्ती’ असे अधोरेखित करत त्यांनी संघकार्याचे महत्त्व विशद केले.

ध्वजारोहण, शस्त्रपूजन आणि प्रात्यक्षिकांनी उत्सवात रंगत
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, संघप्रार्थना आणि शस्त्रपूजनाने झाली. यानंतर स्वयंसेवकांनी घोषवादन आणि विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. सांघिक व वैयक्तिक गीत, सुभाषित आणि अमृतवचनाच्या सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मंचावर बुलढाणा जिल्हा संघचालक सुभाष मोरे आणि चिखली नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मान्यवरांचा परिचय आणि आभारप्रदर्शन चिखली नगर कार्यवाह यांनी केले. या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला संघाचे स्वयंसेवक तसेच परिसरातील नागरिक, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या उत्सवातून संघटन, शिस्त, सामाजिक समरसता, स्वदेशी आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यात आला.