“दहावीच्या निकालाची उलटगणती सुरू!” — मे महिन्यातच लागणार निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला...असा पहा निकाल! 

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची नजर आपल्या निकालाकडे लागली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

२ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. १८ मार्च रोजी दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर जवळपास दीड महिना उलटला असून, सध्या उत्तरपत्रिकांची तपासणी अंतिम टप्प्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या निकालानंतर १० ते १२ दिवसांच्या आत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो. याबाबत लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
ऑनलाइन कसा पाहाल निकाल?..
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील संकेतस्थळांवरून सहजपणे निकाल पाहू शकतात—
* mahresult.nic.in
* sscresult.mkcl.org
* mahahsscboard.in
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक आहे. काही क्षणातच निकाल स्क्रीनवर उपलब्ध होईल. याशिवाय ‘डिजिलॉकर’वरही विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
दरम्यान, निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल निर्णायक ठरणार आहे.