पेनटाकळी प्रकल्पाच्या साकळी कालव्याची दुरुस्ती होणार

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पाचे हस्तांतरण शासन निर्णयानुसार झालेले नाही. सद्यःस्थितीत पेनटाकळी प्रकल्प हा बांधकामाधीन असून या प्रकल्पाचे साकळी क्रमांक शून्य ते ११ किलोमीटर दरम्यान कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडले असता पाझरामुळे सुमारे ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे साकळी क्रमांक शून्य ते ११ कि.मी मधील लाभधारक शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी न सोडण्याचे निवेदन यापूर्वी दिलेले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अधीक्षक अभियंता, बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलडाणा, कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प विभाग, देऊळगाव राजा यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानुसार साकळी क्रमांक शून्य ते ११ कि.मी. वरील दुरुस्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना बांधकाम विभागामार्फत तात्काळ करून देण्याचे ठरले आहे, असे उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मेहकर यांनी प्रसिद्धी पत्रान्वये कळविले आहे.