बँक मित्र शासन आणि समाजाचा दुवा ठरेल! संदीप शेळकेंचे प्रतिपादन!वन बुलडाणा मिशनतर्फे १६० बँकमित्रांना नियुक्तीपत्रांचे वाटप 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बँकिंगच्या नियमित कामकाजाशिवाय शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या विविध शासकीय अनुदानाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, पीकविमा, महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजनांची माहिती संकलित करुन अर्ज शासकीय यंत्रणेकडे पोहचवणे आदी कामे करुन बँक मित्र हा शासन आणि समाजाचा दुवा ठरेल, असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी व्यक्त केला.

वन बुलडाणा मिशन आगामी तीन महिन्यांत जिल्हयात एक हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत ३ ऑगस्ट रोजी १६० युवक- युवतींना बँक मित्र म्हणून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. बुलडाणा रेसिडेन्सीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सहकार्याने बँक मित्र संकल्पना राबविण्यात येत आहे. बँकेचे नवीन खाते उघडणे, पिग्मी खाते, डिपॉझिट, गोल्ड लोन, वसुली, पतसंस्थेच्या कामाची माहिती देणे या कामांच्या व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, शिक्षण, सहकारासह इतर क्षेत्राशी निगडित जनतेची कामे बँक मित्र करतील. युवक- युवतींना रोजगार दिल्याचे आत्मिक समाधान असून आपण जे बोलतो ते करतो, असेही ते म्हणाले. 

रोजगाराच्या संधीचे तरुणाईकडून स्वागत

जिल्ह्यात बेरोजगारी ही प्रमुख समस्या आहे. रोजगाराच्या शोधात तरुणाईचा लोंढा महानगरांमध्ये जातो. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी रोजगारावर लक्ष केंद्रित केले आहे. एवढेच नव्हे तर रोजगार उपलब्ध केला आहे. जिल्ह्याच्या विकासात याचा नक्कीच हातभार लागेल, अशा प्रतिक्रिया बँक मित्र तरुणाईकडून व्यक्त करण्यात आल्या.

उद्यापासून करणार कामाला सुरुवात 

निवड झालेल्या बँकमित्रांना गुरुवारी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना कामकाजाबाबत तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या समस्यांचे निराकरण करुन मार्गदर्शन करण्यात आले. उद्यापासून बँक मित्र आपल्या शाखेवर रुजु होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत.