युती होईल ती संपूर्ण जिल्ह्यासाठीच! आ. संजय गायकवाड स्पष्टच बोलले; म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती आवश्यकच...
Oct 1, 2025, 11:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुती होईल की नाही याबाबत सगळीकडे संभ्रम कायम आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय गायकवाड यांनी वेळोवेळी युतीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काल, मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतही त्यांनी युतीवर भाष्य केले. भाजप शिवसेनेची युती नैसर्गिक युती आहे..युती व्हावी ही शिवसेनेच्या व भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे..मात्र युती होईल तर ती संपूर्ण जिल्ह्यासाठी होईल असे आ.गायकवाड म्हणाले..
मोठ्या निवडणुकांमध्ये युती होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या विजयासाठी युती आवश्यक आहे. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही स्वतःहून त्यासाठी दोन पावले पुढे येतो, मात्र तिकडून देखील सकारात्मक प्रतिसाद आला पाहिजे.. नाहीतर आमचा नाईलाज होईल असेही आ.गायकवाड म्हणाले. भाजप शिवसेनेची युती झाली तर ती संपूर्ण जिल्हाभरासाठी असेल. केवळ एखाद्या मतदारसंघासाठी युती होणार नाही.. आधीच्या निवडणुकांप्रमाणे जिथे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे सूत्र असेल असेही आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले..