कृषि विभागाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाकडे वळवावे! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलांचे निर्देश; आणखी काय केल्या सूचना? वाचा...
Aug 1, 2024, 20:06 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र ही पिके नगदी पिके असली तरी यातून शाश्वत उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषि विभागाने शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळणारे इतर पिके, फळपिके, औषधी वनस्पतीकडे वळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी योजनांची माहिती सादर केली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, परंपरागत शेतीपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणे आवश्यक आहे. नगदी पिके असणाऱ्या सोयाबीन आणि कापसापासून शेतकऱ्यांना परवडेल असे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पर्यायी पिके, भाजीपाला, फळपिकांकडे वळविणे आवश्यक आहे, असे करीत असताना शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा. शेती किफायतशीर करण्यासाठी किटकनाशके आणि खतांचा वापर प्रमाणात करण्यात यावा.
शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीसाठी ई-पिक पाहणी महत्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करावी, यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना देण्यात येणारे सर्व लाभ आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बँक खाते आधार संलग्न करावे, मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी ठेवावा. यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. पारंपरिक पिकांपासून शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळविताना विविध फळपिके घेण्यासाठी त्यांना माहिती देण्यात यावी.
जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी करावे. सध्यास्थितीत या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात नसल्याने प्रक्रियेसाठी इतर राज्यात जात आहे. या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. औषधी वनस्पती लागवड होण्यासोबतच त्यावरील प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.