Breaking बुलढाण्यात तणाव वाढला! आमदार संजय गायकवाड समर्थकांसह पोलिस ठाण्याला घालणार घेराव; पोलिस अधिकारी आमदार गायकवाडांच्या भेटीला "मातोश्री" वर..! बुलढाण्यात पोलिस बंदोबस्त वाढवला...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील संघर्ष आणखीच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. "बाईला बापासारख शरीर कुठून आणणार?" या विधानावरून कालच बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदार गायकवाड आणि त्यांचे समर्थक बुलडाणा शहर पोलीस ठाण्याला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. बुलडाणा येथील मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आमदार संजय गायकवाड यांच्याशी चर्चा करायला मातोश्रीवर दाखल झाले आहेत..

 

 

 कालच बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध "बाप" विधानावरून गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान यावर काय बोलायचे ते उद्या बोलेन असे काल आमदार गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. त्यामुळे आज आमदार गायकवाड काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. आता आमदार संजय गायकवाड आणि समर्थकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालण्याची तयारी केली असल्याचे समोर येत आहे. मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर समर्थकांनी गर्दी केली असून बुलढाण्यात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर आमदार गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यासाठी मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर पोहचले आहेत.

पोलिस अधिकारी पायीच पोहचले आमदार गायकवाडांच्या कार्यालयात...

आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर हालचाली गतिमान झाल्याची माहिती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.पोलिसांच्या पूर्वनियोत कार्यमानुसार आज बुलडाणा पोलिसांचा रूटमार्च होता. मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या संभाव्य घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च तात्पुरता स्थगित करण्यात आला. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यापासून अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,उपविभागीय अधिकारी श्री यामावर घाईघाईत आमदार गायकवाडांच्या कार्यालयात पायीच निघाले अन् पायीच पोहचले....