बुलढाण्याला दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत घ्या; शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या! केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे लेखी मागणी...;म्हणाले, दुष्काळाची दाहकता बुलडाण्यातही....
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात पुरेसा पाऊस न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालाचा दाखला देत प्रतापराव जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा तब्बल ८७ टक्क्यांनी कमी नोंदविण्यात आले आहे. तसेच २ ते ३ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत बुलढाणा येथे पावसाची नोंद झालेली नाही.
या परिस्थितीची दखल घेत ५ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील आवश्यक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यातील पर्जन्यस्थिती आणि खरीप पिकांवरील संकट कायम असल्याचे जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी विदर्भातील जिल्ह्यांप्रमाणेच बुलढाण्यातील शेतकरीही पावसाच्या खंडामुळे चिंतेत आहेत. त्यामुळे शासनाने ज्या निकषांच्या आधारे दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार केला आहे, त्याच निकषांवर बुलढाणा जिल्ह्याचा तातडीने फेरआढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करणे, खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई देणे आणि हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास आवश्यक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत तातडीने निर्णय घेणे, यांचा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. शासनाच्या मदतीपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करून आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.