सैलानी यात्रेत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; झाडांना ठोकल्या काळ्या बाहुल्या, वनविभागाकडे तक्रार
व्याधी दूर होण्याच्या समजुतीतून वृक्षांवर खिळ्यांचा मारा; पर्यावरणप्रेमींकडून कारवाईची मागणी

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सैलानी यात्रेदरम्यान अंधश्रद्धेच्या नावाखाली झाडांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्याधी दूर होईल किंवा संकट टळेल, या समजुतीतून काही भाविकांकडून झाडांच्या खोडावर खिळे ठोकून काळ्या बाहुल्या, लिंबू-बिबे लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते व वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष जे. पाटील यांनी वनविभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील रहिवासी असलेले डॉ. पाटील सैलानी यात्रेसाठी आले असताना दर्गा परिसर व लगतच्या डोंगरातील अनेक झाडांवर खिळ्यांनी काळ्या बाहुल्या ठोकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अंधश्रद्धेच्या या प्रथेमुळे झाडांना गंभीर इजा होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेत काही झाडांमधील खिळे काढून त्यांची सुटका केली. यासंदर्भात त्यांनी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांना निवेदन देऊन या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सैलानी परिसरातील अनेक वृक्षांना खोडापासून फांद्यांपर्यंत खिळे ठोकण्यात आल्याने झाडे जखमी होत आहेत. काही वृक्ष तर याच कारणामुळे वाळून पडल्याचेही निदर्शनास येत असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. झाडांना इजा करणे हे पर्यावरणासाठी घातक असून वन कायद्यांनुसारही ते गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय यात्रेदरम्यान जादूटोणा किंवा अंधश्रद्धेशी संबंधित साहित्याची विक्री होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विशेषतः घोरपड या संरक्षित वन्यजीवाच्या अवयवांचा जादूटोण्यासाठी वापर केला जात असल्याची गंभीर बाबही त्यांनी लक्षात आणून दिली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत घोरपड हा संरक्षित प्राणी असून अशा प्रकारचा व्यापार बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी सैलानी यात्रेत झाडांवर खिळे ठोकण्याची ही अघोरी प्रथा पुन्हा-पुन्हा घडत असल्याचा आरोप करत डॉ. पाटील यांनी या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे. दर्गा परिसरात खिळे, बिबे व काळ्या बाहुल्या विकणाऱ्यांवर कारवाई करून अशा साहित्याच्या विक्रीवर बंदी घालावी तसेच झाडांच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या उभाराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या प्रथेविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा सैलानी परिसरातील वृक्षसंपदा गंभीर धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.