चिखला प्रकरणी पोलिसांची कठोर कारवाई; ३७ जणांवर गुन्हे, २३ अटकेत:
अफवांवर विश्वास ठेवू नका; एसपी नीलेश तांबे यांचे आवाहन...

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे अज्ञात व्यक्तींनी बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी रोजी स्थळ पाहणी व बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी शेगाव येथे आले असता पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोंढे, पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तांबे यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.