विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा! मानेगाव-येरळी मार्गावरील बसेस थांबवून ग्रामस्थांचे आंदोलन..!

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जळगाव जामोद ते नांदुरा मार्गावरील येरळी परिसरात एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरवले जात होते. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज सकाळपासून अचानक आंदोलन छेडत सर्व एसटी बसेस अडवून धरल्या. या अनपेक्षित आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.

एसटी महामंडळाच्या बसेस जुन्या पुलाऐवजी येरळी येथील नवीन पुलावरून जात असल्यामुळे मानेगाव आणि येरळी येथील विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांना पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांना गावापासून लांब रस्त्यावर उतरवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
ही स्थिती अनेक दिवसांपासून सुरू असून, एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर गावकऱ्यांनी आज सकाळी एसटी बसेस अडवत रास्ता रोकोसदृश आंदोलन छेडले. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसटी आगार व्यवस्थापक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या मागण्या ग्राह्य धरून आगार व्यवस्थापकांनी यापुढे सर्व बसेस मानेगाव आणि येरळी या गावांतूनच पाठवण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनामुळे प्रशासन आणि एसटी महामंडळाला ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे लागले असून, भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.