दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख मदतीसाठी राज्यव्यापी शेतकरी आंदोलनाचा आज एल्गार! रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर हल्लाबोल;
बुलढाण्यात तुपकर स्वतः मैदानात, पोलिसांचा तगडा बंदोबस्त....
राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचाही त्यात समावेश आहे. मात्र, केवळ दुष्काळ जाहीर करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, पीककर्ज माफ करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा आणि शेतीमजुरांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत.
तुपकरांच्या याआधीच्या आंदोलनांची आक्रमकता पाहता जिल्हा पोलिस दलाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेली आंदोलने, मुंबईतील विधानभवन परिसरातील आंदोलन आणि विविध मागण्यांसाठी पुकारलेले एल्गार लक्षात घेता आजच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
दुष्काळाच्या घोषणेनंतर अवघ्या दोन दिवसांत या राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. इतक्या कमी वेळेत राज्यभरातील शेतकरी किती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतात, याबाबत उत्सुकता आहे. बुलढाण्यात स्वतः रविकांत तुपकर उपस्थित राहणार असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आज सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. दुष्काळी मदत, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आज राज्यभरात कोणत्या स्वरूपाचा एल्गार उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.