भरधाव अज्ञात वाहनाची स्कुटीला जोरदार धडक; वडिलांचा मृत्यू, चिमुकली बचावली! मुलीला घेऊन जात असताना काळाचा घाला; मेरा खुर्द फाट्याजवळ भीषण अपघात....

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला स्कुटीवर घेऊन प्रवास करणाऱ्या पित्याच्या आयुष्याचा भरधाव अज्ञात वाहनाने घात केला! पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रवी बोरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेली चिमुकली या अपघातातून बचावली. मात्र, पित्याचा मृत्यू झाल्याने चिमुकलीचे पितृछत्र हरपले आहे. ही हृदयद्रावक घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी मेरा खुर्द फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी बोरकर हे एमएच ३७ यू ८१३६ क्रमांकाच्या स्कुटीवरून आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीला घेऊन मेरा खुर्द येथून चिखलीकडे जात होते. दरम्यान, मेरा खुर्द फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, रवी बोरकर आणि त्यांची चिमुकली रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात रवी बोरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर त्यांच्यासोबत असलेली चिमुकली जखमी झाली. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनाचा चालक घटनास्थळावरून निघून गेला.

मदतीसाठी धावले पोलीस कर्मचारी; मात्र वडिलांचे प्राण वाचले नाहीत!

दरम्यान, याच रस्त्याने जाणारे अंढेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोनकांबळे यांनी अपघात पाहताच तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी त्यांनी अनेक वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला एकही वाहन थांबले नाही. अखेर एका खासगी वाहनातून दोघांनाही चिखली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणीअंती रवी बोरकर यांना मृत घोषित केले. तर जखमी चिमुकलीवर उपचार सुरू आहेत.

वडील कायमचे हरपले; चिमुकली बचावली!

या अपघातात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला, मात्र तिच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.