SPECIAL पुन्हा इलेक्शनची धामधूम! अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर;

बुलढाण्याचे दत्तात्रय लहाने आणि सुरेश देवकर आमने-सामने! शिक्षकांचा आमदार यावेळी बुलढाण्याचा होईल का? उत्तर शिक्षकांच्या हातात...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच आता विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही जाहीर झाली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह अमरावती विभागात पुढील महिनाभर शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. 

 

या निवडणुकीचे विशेष महत्त्व म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील दोन प्रमुख चेहरे आधीच रिंगणात उतरले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रा. दत्तात्रय (डी. एस.) लहाने यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिक्षक भारतीकडून प्रा. सुरेश देवकर हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बुलढाण्याच्या या दोन उमेदवारांमध्ये रंगणारी लढत चर्चेचा विषय ठरणार आहे. 

दत्तात्रय लहाने यांची आधीच तयारी; सामाजिक कामाचीही पार्श्वभूमी

प्रा. दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच जाहीर झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांना अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार केले आहे. ऑगस्टमध्ये अमरावती येथे त्यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा संकल्प मेळावाही झाला होता. या मेळाव्याला बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. 

सामाजिक क्षेत्रातही लहाने यांचे काम राहिले आहे. विशेषतः विधवा व परित्यक्ता महिलांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ चर्चेत आली होती. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे सामाजिक काम, राजकीय संघटन आणि शिक्षक मतदारसंघातील संपर्क या मुद्द्यांवर त्यांची प्रचारयंत्रणा उभी राहण्याची शक्यता आहे.

सुरेश देवकर यांचीही जोरदार मोर्चेबांधणी

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातीलच प्रा. सुरेश देवकर हे शिक्षक भारतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अमरावती विभागातील शिक्षकांमध्ये संघटनात्मक संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. अमरावतीसह यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्येही त्यांच्या संघटनात्मक कामाची चर्चा आहे.

अलीकडे यवतमाळ येथे झालेल्या शिक्षक भारतीच्या अधिवेशनात देवकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

बुलढाण्याच्या दोन चेहऱ्यांमध्ये सामना; इतर उमेदवारही रिंगणात येणार

अमरावती शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे लहाने आणि देवकर यांच्यासोबतच विभागातील इतर संभाव्य उमेदवारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीतील अंतिम चित्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट होईल.

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबरला अधिसूचना, ६ ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 

शिक्षकांचा कौल कुणाला?

शिक्षकांचे प्रश्न, संघटनात्मक ताकद, उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क, राजकीय पक्षांचे पाठबळ आणि पाचही जिल्ह्यांमधील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.विशेष म्हणजे अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मैदानात यंदा बुलढाणा जिल्ह्यातील दोन चेहरे ठळकपणे समोर आले आहेत. त्यामुळे आता प्रश्न एकच—शिक्षकांच्या मतपेटीतून विधानपरिषदेत बुलढाण्याचा चेहरा पोहोचणार का? याचे उत्तर २७ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर मिळणार आहे.