सोयाबीन व्यापाऱ्याला तीन महिने कारावास! शेतकऱ्याला १ लाख ७५ हजारांची नुकसान भरपाई धनादेश अनादर प्रकरणी बुलडाणा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ॲड. गुणवंत नाटेकर यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश

 
 बुलडाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे थकवून धनादेश देणे आणि तो धनादेश बँकेत अनादरित होणे, सोयाबीन व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात बुलडाणा येथील न्यायालयाने संबंधित व्यापाऱ्याला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, एक लाख ७५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशांसाठी न्यायालयीन लढा देणारे ॲड. गुणवंत नाटेकर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे हा महत्त्वपूर्ण निकाल लागला.

नेमके प्रकरण काय?

साखळी बु. येथील शेतकरी श्याम देशमुख यांनी २०२० मध्ये मालवंडी येथील एका सोयाबीन व्यापाऱ्याला तब्बल २ लाख ७७ हजार रुपयांचे सोयाबीन विकले होते. मात्र, व्यापाऱ्याने संपूर्ण रक्कम अदा न करता काही पैसे दिले आणि उर्वरित १ लाख १० हजार रुपयांसाठी १५ डिसेंबर २०२० रोजी मराठा अर्बन पतसंस्थेचा धनादेश दिला. शेतकरी देशमुख यांनी हा धनादेश बँकेत जमा केला असता तो अनादरित झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ॲड. गुणवंत नाटेकर यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयात काय घडले?

सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी संबंधित पतसंस्थेला धनादेश वितरित करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला. यासाठी उच्च न्यायालयातील काही न्यायनिर्णयांचाही आधार घेण्यात आला. मात्र, फिर्यादी पक्षातर्फे बाजू मांडताना ॲड. गुणवंत नाटेकर यांनी २६ मार्च २०२६ रोजीचा केरळ उच्च न्यायालयाचा क्लारा डॉमिनिक विरुद्ध टॉमी ईपन हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले न्यायनिर्णय विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने व्यापाऱ्याला दोषी ठरवले.

तीन महिने कारावास, १.७५ लाखांचा दंड!

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा. टेकवाणी यांच्या न्यायालयाने आरोपी सोयाबीन व्यापाऱ्याला तीन महिन्यांच्या कारावासासह १ लाख ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेतमाल विकल्यानंतरही आपल्या हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. मात्र, या निकालामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होणार आहे. परिसरात या निकालाची चर्चा सुरू असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.