दुष्काळाने सोयाबीन करपले; शेतकरी संघटना व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाळलेली सोयाबीनची

 झाडे फेकून संतापाचा भडका; तुपकरांची हेक्टरी १ लाखाच्या मदतीसाठी आक्रमक मागणी, खामगाव-शेगाव-मलकापूर, लोणारमध्येही 'क्रांतिकारी' चा आंदोलनाचा धडाका!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा):पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था दयनीय झाली असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आज बुलढाण्यात शेतकरी आंदोलनाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद करण्यात आला. राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, या प्रमुख मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुष्काळाने करपलेले सोयाबीन थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आणून टाकण्यात आले. एवढेच नव्हे तर वाळलेल्या सोयाबीनची झाडे जिल्हाधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांच्या शेतातील विदारक परिस्थितीचा आरसाच प्रशासनासमोर ठेवण्यात आला.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर स्वतः आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवले.

  पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज द्यावी, जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलावे आणि रखडलेला पीकविमा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेता सरसकट कर्जमाफी करावी, २०१९ पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश करावा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी पुन्हा रेटण्यात आली.
कर्ज पुनर्गठन तसेच रूपांतरित कर्जधारकांनाही मदतीच्या कक्षेत आणावे. कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा सिबिल खराब होऊन भविष्यातील कर्जाचे दरवाजे बंद होऊ नयेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनांनी मांडली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरबीआयशी चर्चा करून बँकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

चार तालुक्यांतही क्रांतिकारीचा सरकारविरोधात एल्गार

बुलढाणा शहरापुरते हे आंदोलन मर्यादित राहिले नाही. जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले.
खामगावमध्ये क्रांतिकारीचे शिलेदार शुभम राऊत आणि निलेश गवई यांच्या पुढाकारातून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेगावमध्ये तालुकाप्रमुख राजेश शेळके आणि शहरप्रमुख संतोष खेर्डे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मलकापूरमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सचिन शिंगोटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तर लोणारमध्ये क्रांतिकारीचे सहदेव लाड यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. हलगीच्या दणदणाटातून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, असा इशारा देण्यात आला.

आंदोलनापूर्वी तुपकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दरम्यान, आंदोलनापूर्वी रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ, इसरुळ आणि देऊळगाव घुबे परिसरातील शेतशिवारात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांनी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. पावसाअभावी करपलेली पिके, हातातोंडाशी आलेले संकट आणि वाढती कर्जाची चिंता या पार्श्वभूमीवर आता सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत जमा करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र आणि राज्यव्यापी करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे..

यावेळी देविदास कणखर, एकनाथ थूट्टे पाटील,दामोदर शर्मा, विनायक सरनाईक रंजीत डोसे, मुरली महाराज येवले, राजू ठाकूर, रितेश पाटील,राजू शेटे,गणेश थुटे,अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, रितेश पाटील, विठ्ठल वानखेडे, सुनील करांगळे, आत्माराम कुटे, विलास मुजमुले, दिनकर घुबे,रामू हिवराळे, अशोक डांगे, रामदास शिंदे, नंदकिशोर बारस्कर, पांडुरंग घुबे यांच्यासह असंख्य शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थिती होते