“साडेतीन एकरांत सोयाबीन पेरलं, दीड लाख खर्च झाले; पण दाणेच भरले नाहीत, सोंगणीसाठीही पैसे नव्हते!” ईसोलीच्या महिला शेतकऱ्यांची व्यथा ऐकून रविकांत तुपकरांचे डोळे पाणावले;

“घरात भाजीला तेल नव्हतं, डोक्याला पाणी लावलं!” दुष्काळ संघर्ष यात्रेच्या सातव्या दिवशी तुपकरांनी काळीज पिळवटून टाकणारे वास्तव उजेडात आणले..

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : शेतात राबराब राबायचं... उसनवारी करायची... व्याजाने पैसे काढून पेरणी करायची... पिकाला लेकरासारखं जपायचं... पण अखेर निसर्गानेच पाठ फिरवली तर शेतकऱ्याच्या पदरात काय उरतं? कर्जाचा डोंगर, रिकामं घर आणि उद्याच्या जगण्याची चिंता! बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळाने शेतकरी कुटुंबांची किती विदारक अवस्था केली आहे, याचे काळीज पिळवटून टाकणारे वास्तव चिखली तालुक्यातील ईसोली येथे समोर आले. दुष्काळ संघर्ष यात्रेच्या सातव्या दिवशी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महिला शेतकरी आशाबाई मदन लागे आणि कांताबाई शेजूळ यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या महिलांनी सांगितलेली आपबिती ऐकून तुपकरही भावुक झाले. “घरात भाजीला तेल घ्यायलाही पैसे नव्हते, म्हणून बिनतेलाची भाजी बनवली. डोक्याला लावायला तेल नव्हतं, म्हणून पाणी लावलं!” हे शब्द ऐकताना उपस्थितांचे मन हेलावून गेले. शेतकऱ्यांच्या घरातील चूल पेटवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाची गरज अधोरेखित करणारे हे वास्तव होते.

 

 ​​​​​

ईसोली येथील आशाबाई मदन लागे यांनी साडेतीन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. चांगले पीक येईल, चार पैसे हातात पडतील, घेतलेले कर्ज फेडता येईल आणि संसाराचा गाडा कसाबसा पुढे नेता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र दुष्काळाने त्यांच्या आशांवर पाणी फेरले. सोयाबीनच्या पिकाला दाणेच भरले नाहीत. उभे पीक वाळून गेले. साडेतीन एकर शेतीत जवळपास दीड लाख रुपये खर्च झाले; मात्र हातात काहीच आले नाही. परिस्थिती इतकी बिकट झाली की, शेतातील सोयाबीनची सोंगणी करण्यासाठी मजुरी द्यायलाही पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी सोंगणीच केली नाही. एकीकडे शेतीत घातलेले दीड लाख रुपये मातीत गेले, तर दुसरीकडे व्याजाने घेतलेले पैसे आणि इतर देणी डोक्यावर आहेत. आता कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.


दरम्यान तुपकरांशी बोलतांना एका महिलेने घरातील आर्थिक परिस्थिती सांगताना व्यक्त केलेली व्यथा अधिकच अस्वस्थ करणारी होती. “घरात तेल आणायलाही पैसे नव्हते. म्हणून वतेलाशिवाय भाजी केली. डोक्याला लावायला तेल नव्हतं म्हणून पाणी लावलं!” हे शब्द केवळ एका महिलेची व्यथा नव्हती, तर दुष्काळाच्या विळख्यात सापडलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचे विदारक चित्र होते. वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या घरात स्वयंपाकासाठी तेलही नसावे, ही परिस्थिती ऐकून रविकांत तुपकर यांचेही डोळे पाणावले. महिला शेतकऱ्यांच्या वेदना ऐकताना काही क्षण तेही नि:शब्द झाले. कष्ट करूनही पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव त्यांच्यासमोर उभे होते.
या दोन्ही महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर रविकांत तुपकर यांनी केवळ सहानुभूती व्यक्त करून पुढे जाण्याऐवजी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सर्वांनी आपापसात वर्गणी गोळा केली. त्यातून आशाबाई मदन लागे आणि कांताबाई शेजूळ या दोघींना घरातील किराणा भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत फार मोठी नसली तरी संकटाच्या काळात कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहे, हा विश्वास देण्याचा प्रयत्न होता. “ही मदत म्हणजे फुल ना फुलाची पाकळी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या घरातील अशी परिस्थिती पाहून स्वस्थ बसवत नाही,” अशा भावना तुपकर यांनी व्यक्त केल्या.

दुष्काळ संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रविकांत तुपकर गावोगावी जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या समस्या जाणून घेत आहेत. सरकारकडे हेक्टरी एक लाख रुपये मदत, सरसकट कर्जमाफी, पीकविमा आणि शेतमजूर व भूमिहीनांना आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. मात्र ईसोलीच्या शिवारात समोर आलेल्या या वास्तवाने दुष्काळाचे संकट केवळ शेतीतील उत्पादनापुरते मर्यादित राहिले नसून ते शेतकऱ्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या हातांनी जगाची भूक भागवण्यासाठी अन्न पिकवले, त्याच हातांना आज स्वतःच्या घरातील चूल पेटवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ईसोलीच्या महिला शेतकऱ्यांची ही व्यथा दुष्काळाच्या भीषणतेची जाणीव करून देणारी ठरली आहे.