पेरणी करताना अचानक घडलं असं काही की... २० वर्षीय तरुणाचा क्षणात अंत; जळगाव जामोद तालुक्यात नेमकं काय घडलं?...
मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डा खुर्द येथील संकेत प्रभाकर वेरुळकर (वय २०) हा आनंदा श्रीरंग वेरुळकर यांच्या गट क्रमांक ८५ मधील वनूर शिवारात पेरणीच्या कामासाठी गेला होता. शेतातील विजेच्या खांबाच्या ताणाच्या संपर्कात आल्याने त्याला अचानक विजेचा जबरदस्त धक्का बसला. काही क्षणांतच तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
घटनेची माहिती मिळताच विजय वासनकर व इतर ग्रामस्थांनी तातडीने संकेतला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने वेरुळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खेर्डा खुर्द गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, शेतांमधील विद्युत खांब, तारा आणि ताण यांची सुरक्षितता कितपत तपासली जाते, असा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा धोकादायक विद्युत यंत्रणांकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.