झाड कोसळण्याच्या भीतीने समोरच्या घरात झोपले... अन् रात्री चोरट्यांनी घातला डल्ला! कपाट, आलमारी, सोफे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; लोणारच्या ब्राम्हण वेटाळमध्ये खळबळ

 
 लोणार (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात धाडसी घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली आहे. ब्राह्मण वेटाळ परिसरातील रहिवासी सुनील नवरतमल रामावत यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष्य करत कपाट, आलमारी, कोठ्या, सोफे आणि डबे यांची अक्षरशः उलथापालथ केली. घरातील लाखो रुपयांचे सोने, चांदीचे दागिने आणि नगदी रोकड लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रामावत यांची ब्राह्मण वेटाळ भागात जुने आणि नवीन असे समोरासमोर दोन घरे आहेत. गुरुवारी दिवसभर शहरात व परिसरात जोरदार वारा आणि पाऊस सुरू होता. जुन्या घराजवळ असलेले मोठे लिंबाचे झाड वाऱ्यामुळे घरावर कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रामावत कुटुंबाने रात्री जुन्या घराला कुलूप लावून समोरील नवीन घरात झोपण्याचा निर्णय घेतला.मात्र, कुटुंब घरात नसल्याची माहिती अज्ञात चोरट्यांना मिळाली आणि त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रात्री अंदाजे १ ते ३ वाजेदरम्यान चोरट्यांनी घरातील प्रत्येक खोलीची झडती घेत कपाट, लोखंडी आलमारी, धान्याच्या कोठ्या, सोफे आणि डबे फोडून संपूर्ण घर अस्ताव्यस्त केले.

घरातील कपाटात व इतर ठिकाणी ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, नगदी रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला. प्राथमिक माहितीनुसार, लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून नेमक्या नुकसानीचा आकडा पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

शुक्रवारी सकाळी रामावत कुटुंब जुन्या घरी आले असता घरातील सर्व सामान विस्कटलेले आणि कपाटांसह इतर वस्तूंची तोडफोड झालेली दिसून आली. चोरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.लोणार शहरात घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.