लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचा दिवा पेटवण्यासाठी लढणाऱ्या भावाला बहिणीने दिला अनोखा आशीर्वाद! भाऊबीजेला रविकांत तुपकरांनी घेतले मोठ्या बहिणीचे आशीर्वाद;

 औक्षण करताना मीनाताई म्हणाल्या, 'शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळो, बळीचं राज्य येवो!' १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुष्काळ संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर भावाबहिणीचा भावनिक क्षण...

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष... दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणारा भाऊ... आणि त्या भावाच्या पाठीशी आशीर्वादाचा हात ठेवणारी मोठी बहीण! भाऊबीजेच्या निमित्ताने आज असाच एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी आपल्या मोठ्या बहीण मीनाताई गवते पाटील यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. बहिणीने प्रेमाने भावाचे औक्षण केले, तर तुपकरांनी मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घेतले. मात्र, यावेळी बहिणीने दिलेला आशीर्वाद केवळ आपल्या भावाच्या सुखसमृद्धीपुरता मर्यादित नव्हता; त्यात राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सुखाची, समृद्धीची आणि त्यांच्या संघर्षाला यश मिळण्याची प्रार्थना दडलेली होती!

भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण! या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते. मात्र, रविकांत तुपकर यांच्या भाऊबीजेला यंदा शेतकऱ्यांच्या संघर्षाचीही भावनिक किनार लाभली. मीनाताई गवते पाटील यांनी भावाचे औक्षण करत त्यांना आशीर्वाद दिले. आपल्या भावाच्या हातून शेतकऱ्यांची सेवा घडत राहावी, त्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळावे आणि बळीराजाच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतातील उभी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. उत्पादन घटल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर सातत्याने आवाज उठवत आहेत. कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी मदत आणि सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
याच संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून १४ नोव्हेंबरपासून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात 'दुष्काळ संघर्ष यात्रा' सुरू होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाऊबीजेला मिळालेल्या बहिणीच्या आशीर्वादाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

'माझ्या भावाच्या लढ्याला बळ मिळो, बळीचं राज्य येवो!'

मीनाताई गवते पाटील यांनी औक्षण करताना शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळावे आणि बळीचे राज्य यावे, असा आशीर्वाद दिला. आपल्या भावाच्या वैयक्तिक सुखापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करणाऱ्या बहिणीच्या या भावनेने भाऊबीजेचा क्षण अधिक अर्थपूर्ण ठरला.एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे रविकांत तुपकर, तर दुसरीकडे मोठ्या बहिणीसमोर आशीर्वादासाठी नतमस्तक झालेले तेच तुपकर... सार्वजनिक आयुष्यातील संघर्ष आणि कौटुंबिक नात्यातील जिव्हाळा यांचे वेगळे दर्शन या निमित्ताने घडले.