"केवळ राजीनामा देऊन पाप धुतलं जाणार नाही! पेपरफुटीत सामील असलेल्यांना कडक शासन करा! विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा देशभर पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील !

 रविकांत तुपकर यांचे पंतप्रधान मोदींना थेट पत्र

 
 बुलढाणा (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतरही संघर्ष थांबणार नसल्याचा स्पष्ट इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. देशभरात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळासाठी केवळ एका मंत्र्याचा राजीनामा पुरेसा नसून, संपूर्ण भ्रष्ट साखळी उद्ध्वस्त करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून मांडली आहे. 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. या पत्रातून त्यांनी नीट पेपरफुटीत सामील असलेल्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले कारण NEET पेपरफुटीने त्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा घात केला. मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, पेलेट गनचा वापर करण्यात आला आणि शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब असल्याचे तुपकर यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने केवळ नैतिक जबाबदारीचा भाग पूर्ण होतो; परंतु पेपरफुटीचे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणून त्यामागील सूत्रधार, अधिकारी, दलाल आणि संबंधित सर्वांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही. भविष्यात कोणालाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याची हिंमत होऊ नये, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये आणि अधिक कठोर कायदे करण्याचीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली केली आहे.

पत्रात तुपकर यांनी आणखी काही ठळक मागण्या केल्या आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि नागरिकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे मूळ उपटून टाकावे, तसेच पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी.

"देशाच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना केवळ राजीनाम्याच्या आड लपता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना तुरुंगात टाकलेच पाहिजे," असा आक्रमक सूर तुपकर यांनी पत्रातून लावला आहे. या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेतला नाही, तर देशातील तरुण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.