श्रीं’ची पालखी मातृतीर्थ जिल्ह्यात दाखल; विदर्भाच्या हद्दीवर पोलीस दलाकडून जंगी स्वागत; श्रींच्या चरणी नतमस्तक झाले पोलीस अधीक्षक निलेश तांबे...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. सिंदखेडराजा हद्दीत पालखीचे आगमन होताच बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत पालखीचे स्वागत केले. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.



बुलढाणा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या पालखीचे स्वागत सत्कार केले. मुखी गजाननाचा जयघोष, कपाळी केशरी गधं, खाद्यावर भगवी पताका, हातात टाळ आणि मृदुंगाची चाल,अशा भरलेल्या वातावरणात जल्लोषामध्ये 'श्री' च्या पालखीचे स्वागत करण्यात आले. टाळ आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तीमय वातावरणात भाविकही तेवढेच तल्लीन झाल्याचे पहायला मिळत होते."गण गण गणात बोते, जय गजानन, श्री गजानन च्या जय घोषात" स्वगृही म्हणजेच बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत 'श्री' च्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. 

आषाढी एकादशीनंतर गजानन महाराजांची पालखी शेगांवकडे प्रस्थान करत असते. यावर्षी पालखीचे 57 वे वर्ष आहे. शेगांव ते पंढरपूर पर्यत 725 किलोमीटर आणि पंढरपूर ते शेगांव परतीचा प्रवास हा 550 किलोमीटरचा आहे. ठीक ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले तसेच शहरात दाखल होताच जिजामाता नगर मध्ये भाविकांनी रांगोळी व फुले टाकून 'श्री' च्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.