हातात तलवार घेऊन आरडाओरड; शिराळा फाट्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न! पोलिसांना पाहताच तलवार फेकून आरोपी पसार

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गणेशपूर येथील शिराळा फाट्यावर हातात तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना पाहताच तलवार जागेवरच फेकून संशयिताने शेताच्या रस्त्याने पळ काढला. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार जप्त केली असून, नतेश रमेश खरात (रा. गणेशपूर, ता. खामगाव) याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० सप्टेंबर २०२६ रोजी हिवरखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी अक्षय जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, गणेशपूरहून शिराळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिराळा फाट्यावर एक व्यक्ती हातात तलवार घेऊन आरडाओरड करीत आहे. माहिती मिळताच ठाणेदार संदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी विलास साखरे आणि महेंद्र नारखेडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.


पोलिसांना घटनास्थळी नतेश खरात हा हातात तलवार घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता त्याने हातातील तलवार जागेवरच फेकली आणि शिराळा रोडच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो शेताच्या रस्त्याने पसार झाला.यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळावरून तलवार जप्त केली. जप्त तलवारीची एकूण लांबी ३३ इंच असून, पात्याची लांबी २९ इंच, तर लोखंडी मुठीची लांबी ४ इंच आहे. तलवारीची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही तलवार बाळगल्याप्रकरणी नतेश खरात याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.