जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा कृत्रिमच; अनावश्यक साठ्यामुळे होतोय तुटवडा!
पेट्रोल पंपावर रांगाच रांगा; जिल्ह्यात ८० टक्के पेट्रोल पंप बंद! जिल्हाधिकारी डॉ
पाटील म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका...
Updated: Mar 27, 2026, 11:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर सध्या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्या बाबत पसरत असलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अनावश्यक साठ्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे. वाहन चालकांकडून अनावश्यक साठा होत असल्यामुळे सध्याच्या घडीला जिल्ह्यातील ८० टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड झळकत आहेत. मात्र सध्या निर्माण झालेला तुटवडा कृत्रिम असून देशभरात पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. जिल्ह्यातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा वापर करून कडक निर्बंध लागू केले आहेत..
Advt
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कोणत्याही पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनर मध्ये भरून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन किंवा वाहनांच्या टाकीतच भरून देण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठा करताना प्राधान्य देण्याच्या सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने दररोजचा उपलब्ध साठा आणि मागणीची माहिती फलकावर पद्धतशीर करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि विक्रीच्या नोंदणी नियमित अद्यावत ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२ ,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ.पाटील यांनी बजावले आहे.