धक्कादायक! जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढणे जीवावर बेतले;फांदी तुटल्याने झाडावरून पडला कोलवडचा शुभम; जागीच मृत्यू...
Jun 13, 2024, 16:46 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कोलवड शिवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या १४ वर्षीय मुलाचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल १२ जूनला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
शुभम गजानन गवई असे मृतक बालकाचे नाव आहे. कोलवड गावाला लागून असलेल्या एका शेतातील जांभळाच्या झाडावर चढून तो जांभूळ तोडण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, झाडाची फांदी तूटल्यामुळे शुभम खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शुभमला परिसरातील लोकांनी तात्काळ बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण कोलवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.