दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, बुलढाण्यात उबाठा शिवसेनेच्या संतापाचा स्फोट! जयस्तंभ चौक दणाणला; 'धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा'ची आक्रमक मागणी!
जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, प्रवक्त्या जयश्री शेळकेंच्या नेतृत्वात आंदोलन....
जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आणि सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. हातात फलक, घोषणाबाजी आणि सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया यामुळे जयस्तंभ चौक काही काळ आंदोलनाने दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरलीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे ही लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी घटना असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.
देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना केंद्र सरकारने या प्रकरणात जबाबदार आणि पारदर्शक भूमिका घ्यावी, तसेच शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा व पालकांचा ढासळलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
जयस्तंभ चौकात पार पडलेले हे आंदोलन शांततेत झाले असले, तरी आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी आणि संतप्त भूमिकेमुळे परिसरात काही काळ तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले.