शेंबा बु. येथे डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क; जलद ताप व कंटेनर सर्वेक्षण पूर्ण....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा अंतर्गत येणाऱ्या शेंबा बु. उपकेंद्रातील रहिवासी आसावरी प्रवीण वराडे यांचा डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलत १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गावात धडक मोहीम राबवून जलद ताप सर्वेक्षण आणि कंटेनर सर्व्हे पूर्ण केला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मंडाले, जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पांडे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी होगे तसेच तालुका आरोग्य अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी (प्रा.आ. केंद्र शेंबा) डॉ. रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य पथकाने गावात घरोघरी जाऊन जलद ताप सर्वेक्षण केले. यावेळी ताप असलेल्या संशयित रुग्णांचे रक्तजल (सॅम्पल) नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गावात व्यापक कंटेनर सर्व्हे (Container Survey) करून पाणी साठवलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली व ग्रामस्थांना साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान आरोग्य सहाय्यक वैराडकर, कीटक शास्त्रज्ञ मयूर शिरसाठ, प्रदीप झनके, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, तसेच आशा सेविका व इतर आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित होते.आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरामध्ये पाणी साचू देऊ नये, दर आठवड्याला कोरडा दिवस पाळावा आणि तापाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.