खळबळजनक! शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; खिशात सापडलेली चिठ्ठी... नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना..

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विनायक महादेव राऊत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे . तो स्थानिक शाळेत १० वीमध्ये शिक्षण घेत होता.

ही घटना काल, १ जुलै रोजी घडली. विनायकने त्यांच्या शेतातील नव्याने बांधलेल्या घरात एंगलला दोरीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतदेहाची तपासणी करताना विनायकच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्याने वर्गशिक्षक सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चिठ्ठीत, "आईवडीलांबद्दल अपशब्द वापरून वारंवार अपमान केल्याने मी आत्महत्या करीत आहे," असे नमूद करण्यात आले आहे.
या शिक्षकाविरोधात यापूर्वीही वर्तनाबाबत तक्रारी होत्या. गावकऱ्यांनी शिक्षण संस्थेकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सुरुवातीला त्यांची बदली करण्यात आली, मात्र काही दिवसांतच त्यांना पुन्हा त्या शाळेत नियुक्त करण्यात आले. वेळीच योग्य कारवाई झाली असती, तर आज एक चांगला, हुशार विद्यार्थी वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले असून, पिं.राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विद्यार्थ्याच्या आत्महत्येने शिक्षण व्यवस्थेवर आणि शिक्षकांच्या आचारसंहितेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.