जिल्हा कारागृहातील बंद्यांना स्वयंरोजगाराची धडे; कायद्यांनाही फास्ट फूड बनवण्याचे प्रशिक्षण...
Mar 8, 2025, 08:49 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येथील सेंट ग्रामिण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातुन सहा दिवसांचे अगरबत्ती आणि धुपबत्ती बनविणाबाबतच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला बंद्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये ३५३ न्यायाधिन बंदी बंदीस्त आहे. या बदीस्त बंद्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत असून पहिल्या तुकडीमध्ये ३२ बंद्यांनी फास्ट फुड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तर दुसऱ्या तुकडीसाठी दि. १ ते ६ मार्च या कालावधीत अगबत्ती व धुपबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण विजय धर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पुर्ण झालेले आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी बंद्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच बंद्यांना भविष्यात उपजिवीकेसाठी निश्चितच फायदा होणार आहे. सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचे मार्फत कारागृहामध्ये बंद्यांकरीता पुढील प्रशिक्षण शिबिरामध्ये नर्सिग कोर्स, टेलरींग कोर्स, मोटार रिवायडींग असे विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरीता कारागृह अधीक्षक संदीप पां. भुतेकर, वरीष्ठ तुरंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगधिकारी एम.एस. पाटील, सेंट ग्रामिण प्रशिक्षण संस्थाचे संचालक संदीप पोटे, श्रीकृष्ण राजगुरे तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.