कर्जमुक्ती आंदोलनाचा दुसरा दिवस! प्रशासनाकडून जाणून-बुजून दुर्लक्ष? तपासायला डॉक्टर नाही, आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्तही नाही! शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

तुपकर म्हणाले, माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील; अधिकारी सत्ताधाऱ्यांचे चमचे असल्याचा आरोप...
 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज,१६ जूनला दुसरा दिवस असून जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलन सुरू होऊन २४ तासांपेक्षा अधिक काळ उलटला तरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही. तसेच उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकही पोहोचले नाही.दरम्यान, आंदोलनस्थळी कोणताही पोलिस बंदोबस्त नसल्याने आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.

 

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत रविकांत तुपकर यांनी कालपासून बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यासह राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. काल दिवसभरात विविध सामाजिक संघटनांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरीही रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात पोहचले. रात्री उशिरापर्यंत तुपकरांच्या आंदोलनस्थळी गावखेड्यातील शेतकरी आंदोलकांनी भजनाचा कार्यक्रम केला. या आंदोलनाला जसजसा वेळ वाढत जाईल तशा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र असे असतांना आंदोलन स्थळी मात्र अद्यापही बुलढाणा पोलिसांनी बंदोबस्त लावलेला नाही. अद्यापपर्यंत तूपकरांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक देखील दाखल झालेले नाही.

या बाबत प्रतिक्रिया देताना रविकांत तुपकर यांनी प्रशासन आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “मी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे. मात्र प्रशासनाकडून पूर्णपणे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची ही सरकारची प्रवृत्तीच आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील,” असा इशारा त्यांनी दिला. खरे तर पोलीस बंदोबस्त  आणि इतर बाबी या प्रशासकीय बाबी आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. मात्र काही जबाबदार अधिकारी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांचे चमचे म्हणून काम करत असल्याचा आरोपही रविकांत तुपकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल तेव्हा सत्ताधारी नेत्यांना लपायला जागा मिळणार नाही. शेतकरी सत्ताधारी नेत्यांना जोड्याने हाणायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा तुपकर यांनी दिला. कर्जमुक्तीच्या या आंदोलनामुळे सत्ताधार्‍यांच्या पोटात दुखू लागले आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या इशारावर आंदोलनस्थळी एखादा हल्ला होऊ शकतो..मात्र त्यानंतर जे होईल त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा तुपकर यांनी दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी..

 रविकांत तुपकरांच्या यांच्या अन्नत्याग आंदोलनाची बातमी गावगाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. अनेक शेतकरी, शेतमजूर, महिला तूपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात पोहचत आहेत. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच शेतकरी आंदोलनस्थळी गर्दी करत आहेत.