चाईल्ड पॉर्न सर्च केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील तिघांना घडली अद्दल!

 
बुलडाणा : देशभरात केंद्र सरकारने अनेक पॉर्न साईट्‌सवर बंदी घातली आहे. विशेषतः चाईल्ड पॉर्न पाहणे भारतात मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही काही विकृती मंडळी तांत्रिक ज्ञानाचा दुरुपयोग करून चाईल्ड पॉर्न पाहतात. अशा लोकांवर सायबर पोलिसांची कडक नजर आहे. जिल्ह्यात तिघांना बुलडाणा सायबर पोलिसांनी अद्दल घडवली असून, त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

चाईल्ड पॉर्न पाहणे, व्हिडिओ शेअर करणे, त्याला प्रोत्साहन देणे गुन्हा आहे. लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकाने चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घातली आहे. जिल्ह्यात या घटना कमी घडल्याचे चित्र आहे. सायबर पोलिसांची तुमच्या मोबाइलवर नजर असते. चाईल्ड पॉर्न सर्च करणाऱ्यांची माहिती लगेच सायबर पोलिसांना कळते. अशा आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात येते.

मात्र या प्रकरणातील आरोपींची नावे जाहीर करण्यात येत नाहीत, अशी माहिती बुलडाणा सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुभाष दुधाळ यांनी सांगितले. जिल्ह्यात २०२० मध्ये २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर २०२१ या वर्षात १ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाईल्ड पॉर्न सर्च करणाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यावर कमीत कमी ५ वर्षे  शिक्षा आणि १० लाख रुपये दंड व अधिकत्तम ७ वर्षे शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती कायदेतज्‍ज्ञ ॲड. विजय बाजड यांनी दिली.