मुक्या जनावरांचा आवाज बनले संजय गायकवाड; पाळीव प्राण्यांना बिल्ल्याची अट रद्द करण्याची केली मागणी....
Jul 3, 2025, 09:38 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क):हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरांना केवळ कानाला ओळख पटवण्यासाठीचा बिल्ला नसल्यामुळे नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले जात आहे. ही अट पूर्णतः अन्यायकारक असून, ती तात्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी आमदार संजय (संजुभाऊ) गायकवाड यांनी विधानसभेत केली. तसेच शासकीय गुरांचे दवाखाने आणि ग्रामीण पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये आकारली जाणारी १० रुपयांची फी देखील त्वरित रद्द करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून, बुधवारी (२ जुलै) झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात बुलढाण्याचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सभागृहात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरांच्या भरपाईच्या अटींबाबत सरकारला जाब विचारला.
गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाघ, बिबट्या व इतर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात दगावली आहेत. मात्र, वनविभाग केवळ त्या जनावरांच्या बाबतीतच भरपाई देतो, ज्यांच्या कानाला ओळख पटवण्यासाठी बिल्ला (टॅग) लावलेला असतो. या बिनबिल्ली जनावरांना भरपाई नाकारली जाते, जो प्रकार पूर्णतः अन्यायकारक आहे, असे सांगत गायकवाड यांनी ही अट तातडीने रद्द करण्याची मागणी केली.
यासंदर्भात त्यांनी १५ एप्रिल २०२४ रोजीच संबंधित वनमंत्र्यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने त्यांनी पुन्हा सभागृहात हा विषय हिरीरीने मांडला.
यावेळी बोलताना त्यांनी आणखी एक जनहिताचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामीण भागातील शासकीय गुरांचे दवाखाने आणि पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये आजही उपचारासाठी १० रुपयांची फी आकारली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी तशी कमी वाटली तरी, त्यामागील भावना अत्यंत चुकीची आहे. पशुवैद्यकीय सेवा पूर्णतः विनामूल्य असायला हवी, असे गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले.
“शेती आणि पशुधन रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी आवाज उठवत आलो आहे, आणि यापुढेही उठवत राहीन,” असे ठाम विधान करत गायकवाड यांनी ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांची भावना सभागृहात पोहोचवली. या मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आता राज्यभरातून होत आहे....