संदीप शेळकेंकडून श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या जिल्हावासियांना अनोख्या शुभेच्छा! म्हणाले,तर....

पैठणच्या धर्तीवर शेगावात उभारणार संतपीठ; संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासार्थींना होणार फायदा...
 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री संत गजानन  महाराज यांचा  १४६  वा प्रकटदिन मोठ्या भक्तीभावाने जिल्हाभरात साजरा होतोय. संत नगरी शेगावात भाविकांची मोठी गर्दी आणि ८०० पेक्षा अधिक दिंड्या राज्यातील विविध भागातून दाखल झाल्या आहेत.दरम्यान वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चित चेहरा बनलेल्या संदीप शेळके यांनी जिल्हावासियांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यात प्रसिद्ध होणाऱ्या विविध वर्तमानपत्रात संदीप शेळके यांच्याकडून  करण्यात आलेल्या जाहिरातीतून संदीप शेळके यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत, शिवाय सोशल मीडियावर त्यांनी यासंबंधीची एक पोस्ट देखील केली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने संधी दिल्यास संत नगरी शेगावात संतपीठ उभारणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटले आहे.

  वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी जिल्ह्यात राजकीय परिवर्तनाची लढाई सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. सध्या संदीप शेळके यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात सुरू असलेली वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा जिल्ह्यात हिट ठरली आहे. दरम्यान आज श्री संत गजानन महाराज प्रकटदिनी संदीप शेळके यांनी अनोख्या पद्धतीने दिलेल्या शुभेच्छा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. 

 का होतेय शुभेच्छांची चर्चा..?

जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या शुभेच्छा विविध माध्यमांतून दिल्या आहेत. मात्र असे असले तरी संदीप शेळके यांच्याकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेल्या शुभेच्छा लक्ष वेधून घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने संधी दिल्यास मातृतीर्थ सिंदखेडराजा, लोणार, संत नगरी शेगाव तसेच जिल्ह्यातील सर्व तीर्थ क्षेत्र, जल प्रकल्प, अभयारण्य यांना एकत्र जोडून रिलीजीअस हेरीटेज कॉरीडॉर उभारणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटले आहे. याशिवाय श्री क्षेत्र पैठणच्या धर्तीवर वारकरी संप्रदायाचा तसेच संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी संत नगरी शेगावात संतपीठ उभारणार असल्याची घोषणा संदीप शेळके यांनी केली आहे..

काय आहे संतपीठ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत श्री क्षेत्र पैठण येथे संतसाहित्याच्या प्रचार प्रसार व अभ्यासासाठी संतपीठ सुरू करण्यात आले आहे. संतपीठात सध्या ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिल्या जातो. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दरवर्षी २० प्रवेश क्षमता आहे. एकूण १०० विद्यार्थ्यांना दरवर्षी संत परंपरेचे धडे दिल्या जातात.संत तुकाराम गाथा ग्रंथ परिचय,श्री एकनाथी भागवत, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ परिचय, वारकरी संप्रदाय परिचय आणि महानुभव संप्रदाय परिचय हे अभ्यासक्रम पैठण येथील संतपीठात शिकवले जातात. याशिवाय आणखी अभ्यासक्रमाचा देखील त्यात समावेश होणार आहे. याच धर्तीवर आता शेगावात देखील संतपीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संदीप शेळके यांनी म्हटले आहे.