उघड्यावर मांस विक्री, दुर्गंधीमुळे भाविक त्रस्त ! मेहकर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलले उपोषणाचे शस्त्र! प्रशासनाच्या कारवाई ची 'वाट' बघून त्रस्त झालेल्या भक्तांनीही बदलली वाट! 

मेहकर पालिका करते तरी काय?

 

मेहकर (अनिल मंजुळकर): शहराचे आराध्य दैवत असलेल्या आणि तिरुपती बालाजीचे मोठे भाऊ अशी धारणा असलेल्या श्री शारंगधर बालाजी भगवान च्या मंदिराकडे जाणारा रस्ता घाणीच्या विळख्यात असल्याने प्रशासनाकडून उघड्यावरील मासविक्री बंद होईल व तशा प्रकारची कारवाई केल्या जाईल याची वाट पाहून कंटाळलेल्या बालाजी भक्तांनी मंदिराकडे जाणारी ' वाट ' च बदलली आहे. याबाबत असे की, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाल्यापासून बालाजी मंदिर मध्ये महाराष्ट्रातून व  पंचक्रोशीतील भाविक श्री शारंगधर बालाजी मंदिरात दर्शनासाठी येतात. याच रस्त्यावर श्रीक्षेत्र ओलांडेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे तर त्याला लागून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक दगडी धर्मशाळा  आहे.एव्हडे आध्यात्मिक,प्राचीन आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणांकडे जाणाऱ्या  रस्त्यावर सर्रास उघड्यावर मास विक्री करण्यात येत आहे.

नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्स मध्ये नियमाने मास विक्री करता येत नाही.तरीही नियम धाब्यावर बसवून  अनेक वर्षापासून कॉम्प्लेक्स मध्ये मास विक्री सुरू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून मास विक्री सर्रास सुरू आहे. इतकेच काय तर नगर परिषदेच्या भाजीपाला मार्केटला पाच गेट आहे या पाच गेट मधील केवळ एक गेट नागरिकांसाठी खुला राहिलेला आहे. चार गेटवर अतिक्रमण झाले आहे त्यातील तीन गेटवर पंक्के बांधकाम करण्यात आले आहे.

 सगळ्यात महत्त्वाचे ऐतिहासिक पौराणिक वास्तूच्या तीनशे मीटर पर्यंत पक्के बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही हा नियम असताना सुद्धा ओलांडेश्वर मंदिराच्या समोर मंदिरापासून तर दगडी धर्मशाळा म्हणजेच मठ ते ऐतिहासिक जानेफळ वेस पर्यंत अतिक्रमणामुळे भाविक त्रस्त झाले आहे. रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण पालिकेला कसे दिसत नाही ? असा सवाल शहरातील सामान्य नागरिकांना पडला आहे. परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे भाविकांनी मंदिराची वाटच बदलली आहे. हे पाहता मेहकर शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संतोष मे, बालाजी संस्थानचे विश्वस्त उमेश  मुंदडा, ह भ प भागवत महाराज भिसे यांनी अनेक वेळा या समस्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु झोपेचे सोंग घेणार्‍या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून येत्या २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती रोजी नगर परिषदेच्या आवारामध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता व परिसरातील नागरिकांचे व भक्तांचे दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात येत आहे.


''अधिकारी मस्त, नागरीक त्रस्त "


मेहकर नगर परिषदेला प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण वाढू नये यासाठी अतिक्रम विभागासाठी थेट अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. असे असताना सुद्धा शहरांमध्ये अनेक ठिकाणी हल्लीच्या काळामध्ये होत असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहे. पहिले अतिक्रमण बसु देणे व तक्रारी झाल्यानंतर सामान्य नागरिकांचा पैसा पोलीस विभागाला संरक्षणासाठी देऊन अतिक्रमण काढणे हे कितपत योग्य आहे? अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचे काम चोख बजावल्यास शहरांमध्ये नवीन अतिक्रमण होणार नाही. 

सर्व्हिस रस्ते गायब...

शहरातील सर्व्हिस रोड गायबच झाले आहेत.  अनेकांनी सर्व्हिस रोडवर बांधकाम केले आहे. बालाजी नगर मध्ये तर ९ मिटर च्या रस्त्यावरच घर बांधण्यात आले असून ९  मीटर चा अख्खा रस्ताच गिळंकृत करण्यात आला आहे.