संत गजानन महाराजांचे दर्शन घ्यायचेच राहिले!

वाटेतच काळ आडवा आला; स्कॉर्पिओ आणि अल्टो कारची धडक! जुळ्या भावांपैकी एक चिमुकला ठार; आई - भावासह पती पत्नी गंभीर! मेहकर सुलतानपूर रस्त्यावरची घटना

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मृत्यू कधी गाठेल याचा काही नेम नाही. अपघातांच्या घटनांमध्ये तर अनेकदा हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त  झाल्याच्या घटना घडतात. लोणारच्या निखाडे आणि अवचार कुटुंबावर देखील आज २६ मार्चच्या सकाळी दुःखाचा डोंगर कोसळला. सुलतानपुरच्या लाहोटी विद्यालयात क्लर्क असलेल्या अंकुश अवचार यांनी २ - ४ दिवसांपूर्वी अल्टो कार खरेदी केली होती. त्यांच्या पत्नी व लोणार येथील त्यांच्या परिचित शिक्षिका सौ. सविता निखाडे आणि त्यांच्या दोन जुळ्या मुलांसह शेगावला श्री. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. 
 

दरम्यान सकाळी सुलतानपूर नजिक हॉटेल गारवा जवळ स्कॉर्पिओ आणि अल्टो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आर्यन गजानन निखाडे(९) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा जुळवा भाऊ, त्याची सौ. सविता निखाडे आणि अंकुश अवचार व त्यांची पत्नी असे ४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात स्कॉर्पिओ वाहनातील काही जण सुद्धा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतक आर्यन च्या जुळव्या भावाला सुद्धा पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते.
    (या अपघाताचे सविस्तर वृत्त आम्ही पुन्हा बुलडाणा लाइव्ह वर प्रसिद्ध करू...)