RTPCR अन्‌ RAPID मधील फरकाची “भानगड’ कळेना… कुठे ११७४ पैकी ३७ अन्‌ कुठे ५११४ पैकी फक्त ५!!; नक्‍की काय असेल गौडबंगाल??

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लगेचच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली. आता तर दिवाळीपूर्वी तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी सप्टेंबरमधील आकडेवारी मात्र प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचाही गोंधळ उडवणारी ठरू शकते. कोरोनाच्या दोन्ही लाटेत खात्रीशीर ठरलेल्या “आरटीपीसीआर’ चाचण्यांवर प्रशासनाचा भर होता. केवळ २० टक्के …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लगेचच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली. आता तर दिवाळीपूर्वी तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी सप्टेंबरमधील आकडेवारी मात्र प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचाही गोंधळ उडवणारी ठरू शकते. कोरोनाच्या दोन्ही लाटेत खात्रीशीर ठरलेल्या “आरटीपीसीआर’ चाचण्यांवर प्रशासनाचा भर होता. केवळ २० टक्के नागरिकांना तातडीची असल्यास त्यांची “रॅपिड टेस्ट’ करण्यात होती. मात्र आता याउलट चित्र असून ८० टक्के “रॅपिड टेस्ट’ अन्‌ केवळ २० टक्के “आरटीपीसीआर’ चाचण्या करण्यात येत आहेत. “रॅपिड टेस्ट’ने ९९ टक्के अहवाल निगेटिव्ह येत असून, “आरटीपीसीआर’ चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक आहे. याच पद्धतीच्‍या चाचण्या वाढवल्या तर पॉझिटिव्‍हीटी रेटमध्ये मोठी वाढ दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

गेल्या ५ दिवसांत जिल्ह्यात ११७४ “आरटीपीसीआर’ तपासण्या करण्यात आल्या. पैकी ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर ५,११४ रॅपिड टेस्टपैकी केवळ ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज ९ सप्टेंबर रोजी “आरटीपीसीआर’च्या १५१ अहवालांपैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८ टक्के हा चिंता वाढविणारा आहे. दुसरीकडे आज रॅपिड टेस्टचे १२६८ अहवाल प्राप्त झाले. मात्र एकही पॉझिटिव्ह नाही.

बाधित रुग्णांच्या संपर्कातील चाचण्याच बंद
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाइकांचा शोध घेऊन तपासण्या केल्या जात होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही पद्धतच बंद पडल्याचे दिसून येत आहे.

…म्हणून तपासण्या कमी!
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्हा प्रशासनाने कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रयोगशाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याने तपासण्या कमी झाल्या आहेत. मे -जून महिन्यात दिवसाला ५ हजार तपासण्या केल्या जात होत्या. आता मात्र दिवसाला एक ते दीड हजार तपासण्या होत आहेत. त्यात ८० टक्के तपासण्या रॅपिड होत आहेत.