दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची धडक मोहीम; ९ वाहने दोषी, ५८ हजार ५०० रुपयांचा दंड!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी भाडेवाढ केली जाण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान ४८ खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९ वाहने दोषी आढळली आहेत. संबंधित वाहनांवर तब्बल ५८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 ​​​​

१ ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष मोहीम

दिवाळी सणानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात. याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी कंत्राटी प्रवासी बसचालकांकडून मनमानी आणि जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

बुलढाणा आरटीओकडून प्रत्यक्ष तपासणी

या मोहिमेअंतर्गत ३० ऑक्टोबर रोजी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने खासगी ट्रॅव्हल्सच्या व्यावसायिक ठिकाणी जाऊन तपासणी केली. यावेळी संबंधित ऑपरेटर्सना मनमानी भाडे आकारू नये, तसेच एसटीच्या तुलनेत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. याशिवाय कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

कारवाईचा तपशील
* एकूण तपासणी केलेली वाहने : ४८
* दोषी आढळलेली वाहने : ९
* आकारण्यात आलेला दंड : ₹५८,५००

जादा भाडे आकारल्यास प्रवाशांनी तक्रार करावी!

प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा भाडे आकारले जात असल्यास त्यांनी जवळच्या आरटीओ कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीसोबत आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, ट्रॅव्हल्सचे नाव, वाहन क्रमांक आणि तिकिटाचे छायाचित्र पाठवावे.

यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांचा ई-मेल dyrto.28-mh@gov.in उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी

खासगी बसचालक व मालकांनी प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, पीयूसी आणि चालकाचा वैध वाहनचालक परवाना यांचा समावेश आहे. वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेऊ नयेत, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणे, वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालविणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित वाहनमालक आणि चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.

या मोहिमेत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीरसिंग बिलावर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हरीश पवार, राजश्री चौधरी, आशिष इंगळे आणि जितेंद्र सोनवणे यांनी सहभाग घेतला.
दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने तपासणीचा धडाका सुरू केला आहे.