खामगावात RTO चा धडाका! विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई; १.४५ लाखांचा दंड, कारवाईनंतर चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न नागरिकांनी रोखला!
आरटीओच्या तपासणीदरम्यान अनेक वाहनांच्या आसनव्यवस्थेत नियमबाह्य बदल करण्यात आल्याचे, तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आवश्यक परवानगीशिवाय वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात शाळांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याने आरटीओ विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली.
या कारवाईनंतर एमएच २८ बी ३२३९ क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाचा चालक पवन रामभाऊ वानखडे (रा. शिरजगाव) याने आरटीओ कार्यालय गाठले. आपल्या वाहनावर झालेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त करत त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कार्यालयात उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला परावृत्त केले.
दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून, विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित आणि नियमानुसार व्हावी, हाच या कारवाईमागील उद्देश असल्याचे मोटार वाहन निरीक्षक सुजितकुमार बाविस्कर यांनी सांगितले. संबंधित चालकाने केलेला प्रकार हा कारवाई थांबविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे, आपल्या वाहनावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली असून, आरटीओ अधिकाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप चालक पवन वानखडे याने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरटीओ प्रशासन आणि संबंधित वाहनचालकाच्या परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत.