रोहित पवार उद्या बुलढाण्यात! पोलिसांची आणी–बाणी; शिवसेनेने आधीच दिले निवेदन,एकेरी उल्लेख झाला तर.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार उद्या ठरल्याप्रमाणे बुलढाण्यात येत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकीचा कॉल व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांनी बुलढाण्यात येऊन संबंधित पुस्तकाचे वाचन करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान उद्या बुलढाण्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी व शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होऊ नये..तसे काही झाल्यास समाजमनाची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटेल त्यामुळे पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे..

आमदार संजय गायकवाड यांनी मागील आठवड्यात "शिवाजी कोण होता?"या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिव्यांची लाखोली वाहिली होती. पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याचे आमदार संजय गायकवाड यांचे म्हणणे होते.दरम्यान सदर कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेस सह प्रमुख विरोधी पक्षांनी आमदार गायकवाड कारवाई करण्याची मागणी केली होती.

काहींनी बुलढाण्यात येऊन "शिवाजी कोण होता"? या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्याचा इशारा दिला होता. त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील पुढे होते..आता ठरल्याप्रमाणे रोहित पवार उद्या बुलढाण्यात येत आहेत. उद्या बुलढाण्यात ते काय भूमिका घेतात, पुस्तकाचे जाहीर वाचन करतात का? त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर काही बाधा निर्माण होते का? या प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.