रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरवर निर्बंध; ध्वनिमर्यादा पाळणे बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई..

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर, अॅम्प्लीफायर, डॉल्बी साउंड सिस्टीम, प्लाझ्मा साउंड सिस्टीम आदींचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुलढाणा पोलिसांनी ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी आदेश जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या PIL क्रमांक 16/2025 मधील 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्देशांच्या अनुषंगाने हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 36 व 38 अन्वये पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्ह्यात हा आदेश लागू केला आहे.

आदेशानुसार, रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर किंवा इतर ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर करता येणार नाही. संबंधित कार्यक्रम आयोजकांना परवानगी घेतल्यानंतरही Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 मध्ये निर्धारित केलेल्या ध्वनिमर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

ध्वनिमर्यादेनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात 65 व 55 डेसिबल, निवासी क्षेत्रात 55 व 45 डेसिबल, तर शांतता क्षेत्रात 50 व 40 डेसिबल अशी मर्यादा आहे. शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास विशेष निर्बंध असून, अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित ध्वनिवर्धक उपकरणांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.

ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास व दैनंदिन जीवनास त्रास होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व नागरिक, कार्यक्रम आयोजक, मंडळे आणि संस्थांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.