झेंडावंदनानंतर राजीनामा… अन् काही तासांतच डॉक्टरने घेतला टोकाचा निर्णय; कामाच्या तणावातून आत्महत्येने आरोग्य विभागात खळबळ...!

 
मेहकर (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मांडवा फॉरेस्ट येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय 37) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 

डॉ. हाडे मागील सुमारे चार महिन्यांपासून मांडवा फॉरेस्ट येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. या उपकेंद्राची स्थिती आणि उपलब्ध सुविधांची पाहणी करण्यासाठी केंद्रस्तरीय NQAS (National Quality Assurance Standards) पथक येणार असल्याची तयारी सुरू होती. या पार्श्वभूमीवर केंद्राची तयारी पूर्ण करण्यासाठी तसेच पथकाच्या पाहणीवेळी सर्व व्यवस्था योग्य दिसावी, यासाठी विविध सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या कामाच्या वाढत्या दबावामुळे डॉ. हाडे मानसिक तणावाखाली होते का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी झेंडावंदन केले. त्यानंतर सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास देऊळगाव साखरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांच्याकडे राजीनामा सोपविला. राजीनाम्यानंतर ते आपल्या गोहगाव येथील घरी गेले. तेथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

 

'मानसिक स्वास्थ्याची स्थिती ठीक नाही'… राजीनाम्यात नेमकं काय लिहिलं?

या घटनेनंतर डॉ. हाडे यांनी आत्महत्येपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या राजीनाम्यात “माझी मानसिक स्वास्थ्याची स्थिती सध्या ठीक नसल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे”, असा उल्लेख असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांनी दिली. डॉ. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. हाडे राजीनामा घेऊन आल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली होती. तसेच, “कामाचा किंवा दुसरा कोणताही ताण घेऊ नका,” असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने आरोग्य विभागासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी; संघटना आक्रमक

डॉ. संदीप हाडे यांच्या आत्महत्येनंतर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या संघटनेतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. डॉ. हाडे यांनी आत्महत्येपूर्वी राजीनामा का दिला? त्यांच्या मानसिक तणावामागे नेमके कोणते कारण होते? कामाच्या दबावाचा त्यांच्यावर किती परिणाम झाला? या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेकडून केली जाणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि मृतक डॉक्टरला न्याय मिळवून द्यावा, यासाठी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे समजते. तसेच, याबाबत केंद्रीय आयुष मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे.

आर्थिक परिस्थिती चांगली, कौटुंबिक कलहही नसल्याची माहिती

डॉ. हाडे यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक कलह नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

राजीनामा देताना त्यांनी स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे कामाचा ताण किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, पोलिस तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, आरोग्य विभागातील कामाचा ताण आणि कर्मचाऱ्यांवर असलेला प्रशासकीय दबाव याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.