शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असलेल्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या; रविकांत तुपकर यांची मागणी...!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्यांविषयी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यांमुळे आणि विधानसभेत ‘जंगली रमी’ खेळल्याच्या प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तत्काळ समज द्यावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.

तुपकर म्हणाले, "सध्या राज्यभरात शेतकरी विविध संकटांत सापडला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरीया खत मिळत नाही. सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचे मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्र्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र, ते विधानसभेत जुगार खेळण्यात व्यस्त आहेत, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे."
"यापूर्वीही कोकाटे यांनी शेतकऱ्यांना 'भिकारी' संबोधून अपमान केला होता. वारंवार त्यांच्या वक्तव्यांमधून शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता दिसून येते. त्यामुळे सरकारने तत्काळ कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा," अशी जोरदार मागणी तुपकर यांनी केली.
"कृषिमंत्री हे संवेदनशील असले पाहिजेत"
"कृषिमंत्र्यांचे वक्तव्य शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे असले पाहिजे, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे नव्हे. अशा वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढते आणि आत्महत्येचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येईल," असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.
"नुसतेच पंचनामे नकोत, प्रत्यक्ष मदत द्या!"  
सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर हुमणी अळीचे जोरदार आक्रमण झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. फक्त पंचनामे करून उपयोग नाही, प्रत्यक्षात आर्थिक मदत मिळायला हवी, असे तुपकर म्हणाले."मेहकर, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नाही," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हुमणी अळीने झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून, शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे, अशी स्पष्ट मागणी तुपकर यांनी केली आहे.