जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला...

 
 बुलढाणा:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा वपंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागासप्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा अणि सर्वसाधारण स्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. त्याकरीता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरीता विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद बुलढाणा करिता आरक्षण सोडतीची सभा ही नियोजन समिती सभागृह,  जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. बुलढाणा पंचायत समितीची आरक्षण सोडतही याचं ठिकाणी होणार आहे. तसेच  बुलढाणा व्यतिरिक्त  इतर सर्व पंचायत समितीच्या आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये काढण्यात येणार आहे. या आरक्षणाचा प्रारुप १४ ॲाक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत ही १३ ॲाक्टोबर रोजी दुपारी १२.३० काढण्यात येणार आहे. याच दिवशी बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मेहकर, लोणार, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपुर, मलकापुर, नांदुरा आणि मोताळा या पंचायत समिती गणांची सोडत ही अनुक्रमे सकाळी ११ व दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यामधील प्रारुप आरक्षणावर जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसिलदारांकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी हा १४ ते १७ ॲाक्टोबरपर्यंतचा राहणार आहे. या कालावधीत हरकती व आक्षेप नोंदवता येणार आहे.

जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती  गणातील रहिवाशांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.