सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील अवैध धंदे दुर करा! भाजपा युवा मोर्चाचे विधानसभा संयोजक सुरज हनुमंते उपोषणाला बसले; म्हणाले, अवैध धंद्यांना पाठीशी कोण घालतंय..?

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विविध गावांत अवैध धंदे बोकाळले आहेत. पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाही. गावागावातील तरुण पिढी यामुळे बरबाद होत आहे त्यामुळे मतदारसंघातील अवैध धंदे तात्काळ बंद करा या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाचे विधानसभा संयोजक सुरज हनुमंते आजपासून उपोषणला बसले आहेत. आज,१३ सप्टेंबरपासून देऊळगाव राजा बसस्थानकासमोर हनुमंते यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याआधी ७ सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने हनुमंते यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील गावागावात अवैध दारू, वरली मटका जुगार यासारखे धंदे सुरू आहेत. एकीकडे हिंदू धर्मीयांचे पवित्र सण उत्सव सुरू असताना अशा धंद्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. या धंद्यांना काही पॉलिटिकल नेत्यांचा देखील आश्रय असल्याचा गंभीर आरोप हनुमंते यांनी केला आहे. अवैध धंद्यांवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असेही हनुमंते यांनी म्हटले आहे.