इंधनाच्या रांगेतील बळीराजाला दिलासा; राजर्षी शाहू मल्टिस्टेटकडून थंड पाण्याची सुविधा!संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर उपक्रम; शेतकरी, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलसाठी तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीला राजर्षी शाहू मल्टिस्टेट धावून आली आहे. कडक उन्हात इंधनासाठी प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाची तहान भागवण्यासाठी संस्थेच्या वतीने जिल्हाभर थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. काँग्रेस नेते संदीपदादा शेळके व संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या संकल्पनेतून २२ मेपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागत आहेत. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने शेतकरी वर्गाला डिझेलची मोठी गरज भासत आहे. दुसरीकडे तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडल्याने उन्हाचा तीव्र चटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत रांगेत थांबत असून, नंबर चुकू नये म्हणून त्यांना रांग सोडूनही जाता येत नाही.
ही परिस्थिती लक्षात घेऊन संदीपदादा शेळके यांनी सामाजिक बांधिलकी जपत “तहानलेल्या बळीराजासाठी थंड पाणी” ही संकल्पना पुढे आणली. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडगार पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. शुक्रवारी धामणगाव बढे, शेंबा, मोताळा, उदयनगर, आंबेटाकळी, नांदुरा, पातूर्डा, संग्रामपूर, जळगाव, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, मेहकर, देऊळगाव साकरशा, जानेफळ, सुलतानपूर, बिबी, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा येथे पाणीवाटप करण्यात आले.
इंधन टंचाई निवारण होईपर्यंत हा उपक्रम जिल्हाभर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. कडक उन्हात रांगेत उभे असताना थंड पाणी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, संदीपदादा शेळके यांच्या या संवेदनशील पुढाकाराचे कौतुक होत आहे.
सामाजिक प्रश्नांवर तत्परतेने पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून संदीपदादा शेळके पुन्हा एकदा चर्चेत आले असून, “राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.