लोणार सरोवराकाठी उद्या होणार "रेकॉर्ड –ब्रेक" योग महोत्सव! केंद्रीय मंत्री ना.जाधवांचा पुढाकार! एकाच वेळी ७ हजारांहून अधिक योगसाधक करणार त्रिकोणासन!

 ना.जाधव म्हणाले, योगाच्या माध्यमातून सशक्त आणि निरोगी समाजाची निर्मिती...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आंतरराष्ट्रीय योग दिनास अवघे ७५ दिवस शिल्लक आहेत. यंदाच्या योग महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या वतीने उद्या,लोणार सरोवराच्या काठी भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाचा एक रेकॉर्ड होणार आहे, एकाच वेळी सात हजाराहून अधिक योगसाधक त्रिकोणासन करणार आहेत. हा रेकॉर्ड एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिली. काल,५ एप्रिलच्या सायंकाळी बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ना.जाधव यांनी याबाबतची माहिती दिली.

योग साधना ही भारतीय संस्कृतीतील प्राचीन व महान परंपरा आहे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर मन बुद्धी आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. योगाच्या सशक्त व निरोगी समाजाची निर्मिती होते. आज योगाला जागतिक स्तरावरही मोठी मान्यता मिळाली असून भारतीय योगपरंपरेच्या माध्यमातून विश्वकल्याणाचा संदेश दिला जात असल्याचे ना. प्रतापराव जाधव म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने शंभर दिवसांचा योग महोत्सव २०२६ हा कार्यक्रम हाती घेतला असून त्यातील दुसरा ७५ दिवसांचा काउंटडाऊन कार्यक्रम ७ एप्रिल रोजी लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात होणार आहे. या महोत्सवात सुमारे ७००० अधिक योगसाधक सहभागी होणार असल्याचे ना. जाधव म्हणाले.
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत योगसाधक त्रिकोणासन करणार असून हा रेकॉर्ड एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणार आहे. या योग महोत्सवामध्ये इंटरनॅशनल नॅचर्रोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, पतंजली योग संस्थान, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिविंग, लोणार येथील महिला बचत गट, शालेय विद्यार्थी तसेच आयुष विभागातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे ना.जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यातील योग साधकांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ना.जाधव यांनी केले. या पत्रकार परिषदेला मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थांची निदेशक डॉ. काशिनाथ समघंडी व कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य उपस्थित होते.